तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत मिळणार

पणजी : गोवा मंत्रिमंडळात प्रमोद सावंत यांनी सरकार स्थापन केल्यानंतर अवघ्या २४ तासांत मोठा निर्णय घेतला आहे. वर्षभरात प्रत्येक कुटुंबाला तीन घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन सत्यात उतरले आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याशिवाय त्यांचे आठ मंत्रिमंडळातील सहकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. सावंत म्हणाले की, भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार नवीन आर्थिक वर्षापासून तीन घरगुती गॅस सिलिंडर मोफत दिले जातील. लोहखनिज खाणीतून पुन्हा खाणकाम सुरू करणे आणि रोजगार निर्मिती करणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एप्रिल महिन्यापासूनच सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच एप्रिल ते पुढील मार्चपर्यंत प्रत्येक कुटुंबाला तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील.