‘युवकाचा’ प्रामाणिकपणा ! सोन्यासह रोख रक्कम असलेली बॅग केली परत

कोल्हापूर (सुरेश पाटील) : पैसा आणि सोन्याच्या हव्यासापोटी आजच्या जमान्यात नाती बिघडत आहेत. आणि एखाद्याला पैसे, सोने जर सापडलं तर, ज्याच आहे त्याला ते परत मिळेल का? याची शक्यता फारच कमी असते. मात्र अजूनही प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे एक घटना आज पहायला मिळाली. सोन्यासह रोख रक्कम असलेली बॅग प्रकाश देशमुख (रा. आसुर्ले, ता. पन्हाळा) येथील युवकाने प्रामाणिकपणे परत करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

    लोभी मनापुढे प्रामाणिकपणाची ताकद जर मोठी असेल तर लोभाची हार नक्कीच होते. प्रामाणिकते बद्दलची आपल्या मनामध्ये असलेली विश्वासार्हता जेवढी ठासून भरलेली असेल तर लोभाचे नामोहरण झाल्याशिवाय राहत नाही.

     प्रकाश देशमुख यांच्या या प्रामाणिकपणाची हकीगत अशी, देशमुख हे आज मंगळवारी सकाळी कामानिमित्य आपल्या मोटरसायकलवरून कोल्हापूरकडे चालले होते. पोर्ले येथील दालमिया साखर कारखान्याजवळ आले असताना त्यांना मोबाईलवर एक फोन आला. फोनवर बोलण्यासाठी त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. फोनवर बोलत असताना त्यांचे लक्ष कारखान्याच्या रस्त्याच्या समोरील बाजूला असलेल्या एका कठड्यावरील बॅगकडे गेले. देशमुख यांनी बॅग खोलून पाहिली असता, त्यांना त्या बॅगेमध्ये 3 तोळ्याचे सोन्याचे ब्रेसलेट व 20 हजार रुपये रोख रक्कम दिसली. त्याचबरोबर त्यात इतर कागदपत्रेही होती.

 देशमुख यांनी कागदपत्रांवरून सदर व्यक्तीचा फोन नंबर शोधून त्या व्यक्तीस फोन केला. आणि आपली बॅग हरवली आहे का? अशी विचारणा केली.  दालमिया साखर कारखान्याजवळील बेकरी व्यावसायिक असलेल्या कैलास चंद्रकांत कोंडरे (रा. गोलिवडे, ता. पन्हाळा) यांची ती बॅग होती. कोंडरे यांना एक फोन आला आणि ते फोनवर बोलत बोलत तिथेच बॅग विसरून गेले. त्यानंतर त्या परिसरात त्यांनी बॅगची शोधाशोध सुरू केली. दरम्यान देशमुख यांच्याकडून कोंडरे यांना फोन आला आणि त्यांची बॅग त्यांना परत मिळाली आणि कोंडरे यांचा जीव भांड्यात पडला. कोंडरे यांनी देशमुख यांच्या प्रामाणिकतेचे कौतुक करून त्यांचे आभार मानले.

     आज-काल सापडलेली वस्तू प्रामाणिकपणे परत करणं हे दुर्मीळ होत चालल आहे. मात्र, देशमुख यांच्या प्रामाणिकपणातून अजूनही प्रामाणिकपणा जिवंत आहे असं म्हणायला काही हरकत नाही.