पोलीस अधीक्षकांच्या भेटीने भारावली वडणगेतील मुले!

कोल्हापूर : पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आपल्या आसनावर न बसता विद्यार्थ्यांतच रमले अन टेन्शनने भरलेले चेहरे हसरे झाले. काही मिनिटांच्या भेटीत एसपींची माणुसकी आणि पोलिसांची मैत्री देशाच्या भावी पिढीने अनुभवली अन वडणगेतील मुले अक्षरक्ष: भारावून गेली.

वडणगे ( ता. करवीर) येथील सुभाष ग्रुपच्यावतीने ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा’ या उपक्रमांतर्गत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाच्या योजनेचा प्रारंभ पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयातच छोटासा कार्यक्रम झाला.

पोलिस मुख्यालयाची भव्य इमारत, खाकी वर्दीमध्ये वावरणारे अधिकारी, पोलिस कर्मचारी, लाल दिव्यांच्या गाडय़ा अन लोकांची सततची वर्दळ.  हे त्यांच्यासाठी नवीनच होतं. पोलिसांना ते गावात पहायचे. पण आज ते चक्क मुख्यालयात आले होते. काही क्षणातच साहेबांचे बोलावणे आले. घाबरत घाबरतच मुले आत गेली, हसूनच बलकवडे यांनी सर्वांचे स्वागत केले. शालेय साहित्य देउन उपक्रमाचा प्रारंभ केला. मुलांशी गप्पा मारल्या. सर्वच मुलांसोबत फोटो काढले. विशेष म्हणजे बलकवडेसाहेब विद्यार्थ्यांतच रमल्याने टेन्शनने भरलेले चेहरे हसरे झाले होते. समाधानी चेहऱयांनीच सर्वांनी साहेबांचा निरोप घेतला. यावेळी डीवायएसपी गणेश इंगळे, लोकनियुक्त सरपंच सचिन चौगले, प्रविण चौगले, सुरेश उदाळे, जितेंद्र सावंत, सागर चौगले उपस्थित होते.