उत्तरमध्ये उन्हाच्या कडाक्यात बड्या नेत्यांच्या तोफा धडाडणार !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उन्हाच्या कडाक्याबरोबर आता कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचे रान तापू लागले आहे. सध्या आजी- माजी पालकमंत्र्यात आरोपांची चिखलफेक सुरु असून आता राज्यातील आणि केंद्रातील बड्या राजकीय नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत.

  महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असून पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. काँग्रेसला ही जागा कायम राखायची आहे तर ही जागा खेचून आणायची आहे. त्यासाठी दोन्ही बाजूकडून मोर्चेबांधणी सुरु असून दिग्गज नेत्यांच्या सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ऐन उन्हाच्या कडाक्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडणार आहेत. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आदींच्या सभा घेण्याचे नियोजन केले जात आहे.

  भाजपकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, नारायण राणे, किरीट सोमय्या, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड,  माजी मंत्री विनोद तावडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत आ. गोपीचंद पडळकर यांच्या सभा घेण्याचे नियोजन केले आहे.