मतदानाचा हक्क बजावून आपली लोकशाही आणखी मजबूत करा : कंगना रणौत

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेशसह एकूण आठ राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. भारतीय जनता पार्टीने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. आज १ जून रोजी या मतदारसंघातही मतदान चालू असून अभिनेत्री कंगना रणौतने सकाळी तिचा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी कंगनाने सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं. कंगना म्हणाली, लोकशाही हे आपल्याला मिळालेलं वरदान असून निवडणूक हा आपला उत्सव आहे. सर्वांनी या उत्सवात सहभागी व्हायला हवं.

आज लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात मी आमच्या मतदारसंघात मतदान केलं. मी सर्वांना आवाहन करते की सर्वांनी एकत्र येऊन मतदान करा. मतदान हा आपला सर्वात मोठा संविधानिक अधिकार आहे. हा लोकशाहीचा एक मोठा उत्सव आहे. तुम्ही या महापर्वात सहभागी व्हा आणि तुमचं योगदान द्या. तुम्ही जर आमच्या मतदारसंघात पाहिलं तर तिथे एखाद्या सणासारखं वातावरण दिसेल. त्यामुळे मी पुन्हा एकदा आवाहन करेन की सर्वांनी या महापर्वात सहभागी होऊन मतदान करावं. लोकशाही हे आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं वरदान आहे. मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी आपल्या बांधवांनी रक्त सांडलं आहे. त्यामुळेच तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावा आणि आपली लोकशाही आणखी मजबूत करा असे कंगना रणौत म्हणाली.