कोल्हापूर : पोलीस कर्मचारी विविध शासकीय कामासाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या (केएमटी) बसेसमधून मोफत प्रवास करतात. या प्रवासासाठीचे २०२०-२१ या वर्षतील सुमारे ६३ लाख रुपयांची भाडे रक्कम लवकरच केएमटीच्या खात्यात जमा होणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय १६ मार्च जारी झाल्याची माहिती गृह व परिवहन राज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. कोल्हापूर शहर व परिसरातील विविध गुन्हे व तपासाच्या कामी पोलीस दलाचे कर्मचारी व अधिकारी कोल्हापूर महापालिका परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास प्रवास करत असतात. पोलीस कर्मचाऱ्यासाठी ही सुविधा मोफत उपलब्ध करण्यात आली असून त्याचा परतावा शासनाकडून महामंडळाला दिला जातो. २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन महामंडळाच्या बसेसमधून केलेल्या प्रवासापोटी ६२ लाख ९७ हजार ८३५ रुपये रक्कम शासनाकडे थकीत होती. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार विहित पद्धती व नियमांच्या अधीन राहून ही रक्कम अदा करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली.