मुंबई : शरद पवारसाहेब हे साताऱ्यातील प्रचारसभेत पावसात भिजले आणि निमोनिया भाजपला झाला, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
उठसूठ पवारसाहेबांवर बोलणार्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा महेश तपासे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. भाजपला महाराष्ट्रात सत्ता काबीज करता आली नाही हे त्यांचे दुःख आम्ही समजू शकतो अशा शब्दात भाजपच्या दु:खावर महेश तपासे यांनी हल्लाबोल केला. साताऱ्यातील पावसाळी सभेत पवारसाहेबांनी आव्हान केले आणि त्याला महाराष्ट्रातल्या तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे गोपीचंद पडळकर विसरले असावेत याची आठवणही महेश तपासे यांनी करुन दिली आहे.
पवारसाहेबांचे नाव घेतल्याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रसिद्धी मिळत नाही हे कळून चुकले आहे आणि म्हणूनच वारंवार पवारसाहेबांचे नाव घेऊन कुठेतरी प्रसिद्धी मिळविण्याची धडपड आहे अशी मिश्किल टीकाही महेश तपासे यांनी केली.