‘एमआयएम’च्या ऑफर ‘बॉम्ब’चा राज्याच्या राजकारणात ‘स्फोट’

मुंबई : महाराष्ट्रात एमआयएमने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रातील समविचारी तथा सेक्युलर पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र येण्यासाठी राजकीय बॉम्ब टाकल्याने राज्याच्या राजकारणात स्फोट उडाला आहे.

  महाविकास आघाडीत सामिल होण्याची आमची इच्छा आहे, असे खासदार जलील यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, एमआयएम भाजपची बी टीम असू नये कशावरून? औरंगाबाद महापालिकेत या पक्षाचा रोल काय, एमआयएम पुरोगामी आहे का हे पहिल्यांदा पहावे लागेल. युपीच्या निवडणुकीत एमआयएमला ५ हजारच्यावर मते मिळाली जर एमआयएमने सपासोबत युती केली असती तर सध्या युपीतील चित्र वेगळे असते

शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणारे कोणीही असतील ते महाराष्ट्राचे, शिवसेनेचे आणि राज्यातल्या कोणत्याही पक्षाचे आदर्श होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर उघड किंवा छुपी हातमिळवणी होऊ शकत नाही. ज्यांच्याबरोबर त्यांची छुपी हातमिळवणी आहे ती त्यांना लखलाभ ठरो.

 एमआयएम सोबत महाविकास आघाडी हात मिळवणी करणार का? या प्रश्नावर शिवसेना काय भुमिका घेतेय हे पहायचयं, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.