कोल्हापूर : राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य असते. असाच एक योगायोग कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समोर आला आहे. उत्तरसाठी काँग्रेसची उमेदवारी भाजपच्या माजी नगरसेवक असलेल्या जयश्री जाधव यांना मिळाली आहे. तर भाजपची उमेदवारी मूळचे कॉंग्रेसचे असलेले सत्यजित कदम यांना जाहीर झाली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी थेट लढत भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच होणार आहे. काँग्रेसकडून जयश्री चंद्रकांत जाधव यांचे नाव निश्चित झाले आहे तर भाजपकडून सत्यजित उर्फ नाना कदम यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. हे हे दोन्ही उमेदवार कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनामुळे कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक लागली आहे. चंद्रकांत जाधव जरी काँग्रेसचे आमदार असले तरी त्यांच्या पत्नी जयश्री भाऊ व संभाजी हे भाजपच्या तिकिटावर कोल्हापूर महानगरपालिकेचे नगरसेवक झाले होते. त्यामुळे चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस आणि भाजप दोघेही इच्छुक होते. जयश्री जाधव भाजपच्या नगरसेविका असल्यामुळे भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना उमेदवारीची थेट ऑफर दिली होती. तर त्यांचे पती काँग्रेसचे आमदार होते त्यामुळे काँग्रेसकडून पालकमंत्री सतेज पाटील यांनी त्यांना उमेदवारी स्वीकारण्याची विनंती केली होती. शेवटी जयश्री जाधव यांनी काँग्रेसची उमेदवारी स्वीकारली आहे. तर त्यांची ज्यांच्याशी लढत होणार आहे ते सत्यजित उर्फ नाना कदम हे मूळचे काँग्रेसवासी आहेत. ते काँग्रेसचे माजी नगरसेवक होते तसेच त्यांनी २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. त्यावेळी त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. या पोटनिवडणुकीत ते भाजपचे उमेदवार आहेत.