पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ?

नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकासाठी एक मोठी दिलासादायक खूषखबर आहे. युक्रेन आणि रशियातील युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर भडकण्याची शक्यता होती. मात्र रशियाने भारताला सवलतीच्या दरात कच्या तेलाचा पुरवठा केल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.

  अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धामुळे रशियावर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाने भारताला सवलतीच्या दरात तेल आणि इतर वस्तू देण्यास सुरुवात केली आहे. भारत हा मोठा तेल आयातदार देश असून एकूण देशांतर्गत गरजेच्या ८५ टक्के तेलाची आयात केली जाते. रशियाने ऑफर केलेल्या सवलतीच्या दरात भारतीय तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने ३० लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. रशियाकडून अद्याप युक्रेनवर हल्ले सुरुच आहेत. यामुळे अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. याच दरम्यान, भारतातील मोठ्या तेल कंपनीने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने डिलिव्हरीसाठी कच्चे तेल प्रति बॅरल २०-२५ डॉलरच्या सवलतीने खरेदी केले आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे.