ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून चालकच ठार

कुरुंदवाड : रस्त्यालगत पडलेल्या खडीवरून ट्रॅक्टर घसरून झालेल्या अपघातात चालकच ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून ठार झाला. कुरुंदवाड- मजरेवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. सचिन भीमराय चव्हाण (वय २९, रा. जलगिरी, जि. विजापूर) ठार झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सचिन चव्हाण सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास रिकामा ट्रॅक्टर- ट्रॉली घेऊन ऊस भरण्यासाठी कुरुंदवाडकडे चालला होता. मजरेवाडी रस्त्यावरील भबीरे मळ्याजवळ रस्त्यालगत पडलेल्या खडीवरून घसरून ट्रॅक्टरची पुढील चाके हवेत गेली. त्यामुळे चालक सचिन याचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टरमधून तो खाली पडला. यावेळी ट्रॅक्टर मोठे चाक पोटावरुन गेल्याने तो जागीच ठार झाला. तर ट्रॅक्टर रस्त्याशेजारील एका घरात घुसला. त्या घराची भिंत कोसळली आहे.

 दरम्यान, घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. घटनास्थळी सहायक पोलिस निरिक्षक बालाजी भांगे यांनी धाव घेऊन जमाव पांगवला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.