मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील कुरघोडीचं राजकारण संपायचे नाव घेत नाही. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांच्या नव्याने पदस्थापनेवरुनपुन्हा कलगीतुरा रंगला आहे.
अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पन्नालाल पोखरणा यांचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निलंबन रद्द करुन त्यांची नव्याने पदस्थापना केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत दूरचित्रवाहिनीवर बातम्याही झळकल्या. यातून महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल आमने-सामने आल्याचे चित्र होते.
मात्र अशा निर्णयाबाबतची संपूर्ण कार्यवाही शासन स्तरावरच करण्यात आली असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द करण्यात कुठल्याही विशेषाधिकारांचा वापर केला नसल्याचे आज राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले.या संदर्भात काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त पूर्णतः निराधार व कल्पित असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुनील पोखरणा यांचे राज्य शासनाकडून निलंबन करण्यात आले होते. त्यानंतर डॉ सुनील पोखरणा यांनी दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी या निलंबनाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील तरतुदींना अनुसरून राज्यपाल महोदयांकडे दाद मागितली होती.
या संदर्भात राज्यपाल महोदयांनी दिनांक १६ मार्च २०२२ रोजी राजभवन येथे सुनावणी ठेवली होती तसेच या सुनावणीसाठी अर्जदार डॉ सुनील पोखरणा तसेच प्रतिवादी म्हणून शासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग यांना उपस्थित राहण्याबाबत कळविले होते.
सुनावणीच्या वेळी राज्य शासनाने डॉ सुनील पोखरणा यांचे निलंबन दिनांक १५ मार्च २०२२ रोजीच रद्द केले असून त्यांची पदस्थापना वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, शिरूर, जिल्हा पुणे या पदावर केली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती नीलिमा केरकट्टा यांनी राज्यपालांना सांगितले. त्यामुळे राज्यपाल महोदयांच्या आदेशावरून डॉ पोखरणा यांचे निलंबन रद्द झाले किंवा त्यांची पदस्थापना झाली हे वृत्त चुकीचे असल्याचे राजभवनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.