कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील हनुमाननगर परिसरात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून मोठी चोरी केली आहे. या घटनेत सुमारे साडेपंधरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्हीचा DVR असा एकूण 15 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.

स्थानिक रहिवासी संजय वासुदेव जोशी हे काही दिवसांपासून गावाबाहेर गेल्याने त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाट फोडून त्यांनी 25 आणि 15 ग्रॅम वजनाची दोन मंगळसूत्रे, 45 ग्रॅमच्या बांगड्या, 50 ग्रॅमचे गहू-तोडे आणि 20 ग्रॅमचा नेकलेस असा ऐवज लंपास केला.
चोरीचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी घरात लावलेल्या सीसीटीव्हीचा DVR देखील सोबत नेला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
माहिती मिळताच गोकुळ शिरगाव पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि श्वानपथकाने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथकाने चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही. संजय जोशी यांच्या तक्रारीवरून गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
