कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीदरम्यान दि. ०९ सप्टेंबर २०२२ रोजी शिवसेनेच्या स्वागत बूथसमोर रविकिरण इंगवले व त्याच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ निर्माण करून उपस्थित महिलांकडे अश्लील हातवारे केले तसेच शिवीगाळ करून महिलांचा अवमान केल्याचा गंभीर प्रकार घडला होता. या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये केले आहे. त्यामुळे या प्रकरणात महत्त्वपूर्ण व्हिडिओ पुरावा उपलब्ध असून, त्याआधारे घटनेची वस्तुनिष्ठ व सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

या प्रकाराबाबत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर तक्रारीच्या आधारे रविकिरण इंगवले यांच्यासह सुमारे ४० कार्यकर्त्यांविरोधात दि.१६ सप्टेंबर २०२२ रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र, गुन्हा दाखल होऊन चार वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे पण या प्रकरणाची अपेक्षित सखोल चौकशी झालेली नसून आरोपींवर ठोस कारवाई झालेली नाही. महिलांच्या सन्मानाशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष होणे ही चिंतेची बाब आहे. तसेच उपलब्ध व्हिडिओ पुराव्याची तपासणी करून घटनेतील सर्व संबंधितांची भूमिका स्पष्ट होणे आवश्यक आहे.
त्यामुळे सदर प्रकरणाची तात्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, घटनास्थळी पोलीस निरीक्षक विनोद सावंत यांनी केलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्यात यावी, उपलब्ध इतर व्हिडिओ व साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात यावेत आणि तपासाअंती दोषी आढळणाऱ्या सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. महिलांच्या सन्मान व सुरक्षिततेच्या दृष्टीने या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता जलदगतीने तपास पूर्ण करण्याबाबत तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे करण्याच आली आहे. आज शिवसेना महिला आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांची भेट घेवून मागणीचे निवेदन सादर केले.
यावेळी महापालिका शिक्षण सभापती शिला सोनुले, नगरसेविका मंगल साळोखे, शिवसेना शहरप्रमुख पवित्रा रांगणेकर, शहरप्रमुख अमरजा पाटील, समन्वयक पूजा भोर, शिवउद्योग सेनेचे शहरप्रमुख मंगल कुलकर्णी, गीता भंडारी, पूजा कामते, गौरी माळतकर, पूजा पाटील, मीनाताई पोतदार, सुनंदा भोपळे, रुपाली कवाळे, सना अत्तार, ऐश्वर्या साळोखे, वर्षा सुतार, गायत्री सुतार, विद्या तुळके, आरती लाड, नैना क्षीरसागर, अर्चना पाटील, जयश्री सुतार, सुप्रिया क्षीरसागर, संगिता पाटील आदी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
