आमदारांना पाच कोटीचा विकासनिधी; स्वीय सहायक, चालकांचे पगार वाढवले

मुंबई : इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’ म्हणून अर्थसंकल्पावर टिका करत होते असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज लगावला. सर्व आमदारांना ५ कोटीचा विकास निधी तर आमदारांच्या चालकाला २० हजार रुपये आणि स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

अर्थसंकल्पावरील चर्चेवर उत्तर देताना अजित पवार यांनी ‘सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयाची बरे, या संत तुकारामांच्या अभंगाने सुरुवात केली.  राज्य अडचणीतून पुढे जात असताना राज्याला कर्जातून बाहेर काढताना महसूली तुट कशी कमी करता येईल, नागरीकांवर कराचा भार पडता कामा नये व राज्याचा गाडा सुरळीत चालेल, विकासाला खीळ बसणार नाही असा प्रयत्न या अर्थसंकल्पात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.  

 ‘द काश्मीर फाईल’ सिनेमाला करमुक्त करा अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली होती यावर बोलताना अजित पवार यांनी मिशन मंगल, तानाजी, पानिपत हे सिनेमे करमुक्त केल्याची आठवण करून देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘काश्मीर फाईल’ सिनेमाचा उल्लेख केला त्यामुळे केंद्राने हा सिनेमा करमुक्त करण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण देशालाच लागू होईल अगदी जम्मू – काश्मीर ते कन्याकुमारीपर्यत करमुक्त होईल. हे उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्षेप घेतला मात्र अजित पवार यांचे बोलणे झाल्याशिवाय बोलायला दिले जाणार नाही अशी भूमिका तालिका अध्यक्षांनी घेतल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांनी ‘पळाले रे पळाले’ म्हणत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ … ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा दिल्या.

   यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व आमदारांना ५ कोटीचा विकास निधी तर आमदारांच्या चालकाला २० हजार रुपये आणि आमदारांच्या स्वीय सहाय्यकाला ३० हजार रुपये देणार असल्याची घोषणा केली.