उचगाव : करवीर तालुका शिवसेनेच्या पुढाकाराने उचगाव येथे ‘बँक आपल्या दारी’ उपक्रमाअंतर्गत ४०० लाभार्थ्यांना १६ लाख रुपयांच्या रकमेच्या शासकीय योजनेतील पेन्शनचे एकाच ठिकाणी वाटप करण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्केट यार्ड शाखेत संजय गांधी, श्रावण बाळ, वृद्धापकाळ, इंदिरा गांधी, आदी योजनांची पेन्शन दिली जाते. बँकेमध्ये जाण्यासाठी थेट बससेवा नसल्याने पायी चालत जावे लागते किंवा १०० ते २०० खर्चून रिक्षाने जावे लागते. तसेच बँकेत गर्दी होत असल्याने पेन्शनधारक सकाळी पेन्शन आणण्यासाठी गेला की संध्याकाळी ४ ते ५ वाजताच घरी येतो. पेन्शनधारकांची परवड होऊ नये व ‘बँक आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत बँकेच्या सहकार्यातून करवीर शिवसेनेच्या वतीने उचगावातील पेन्शन धारकांना उचगाव येथील मंगेश्वर मंदिरात कॅम्पद्वारे पेन्शनचे वाटप करण्यात आले. करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने ४०० लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगुले, ग्रा. प.सदस्या अर्चना करी, विभागप्रमुख दीपक रेडेकर,बाळासाहेब नलवडे, माजी उपतालुकप्रमुख विक्रम चौगुले, योगेश लोहार, अजित चव्हाण तसेच बँकेचे कर्मचारी शिवाजी कोईगडे, सुनिल केसरकर, मिलींद प्रभावळकर, केरबा माने, विजया माने आदी उपस्थित होते.