संभाजीराजेंच्या स्वागताच्या तयारीसाठी मराठा समाजाची आज बैठक

कोल्हापूर : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांचे मुंबईतील आझाद मैदानावरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर खासदार संभाजीराजे कोल्हापुरात गुरुवारी (दि. १० मार्च) येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या पूर्वतयारीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीने शाहू स्मारक येथे आज दुपारी तीन वाजता बैठकीचे आयोजन केले आहे.

मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण केले होते. राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. राज्य शासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. राज्य शासनाच्या लेखी आश्वासनानंतर खासदार संभाजीराजेंनी हे उपोषण मागे घेतले होते. त्यानंतर संभाजीराजे गुरुवारी कोल्हापुरात येणार असून आहेत. त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने बैठकीचे आयोजन केले आहे.