२४
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेनमधून मागील २४ तासांमध्ये १५ विमाने भारतात पोहोचली असून, ज्यामध्ये जवळपास २९०० भारतीयांना आणले गेले आहे. मिशन गंगा अंतर्गत आतापर्यंत जवळपास १३ हजार ५०० भारतीयांना घेऊन ६३ विमाने भारतात आली आहेत. तर, पुढील २४ तासांसाठी आणखी १३ विमाने नियोजित असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.
अरिंदम बागची म्हणाले, युक्रेनमध्ये आणखी किती भारतीय आहेत, आम्ही याची माहिती घेत आहोत. जे तेथे आहेत परंतु नोंदणीकृत नाहीत त्यांच्याशी भारतीय दूतावास संपर्क करेल तसेच आम्ही २९८ विद्यार्थ्यांना जवळच्या पिसोचिन येथे स्थलांतरित केले आहे.
भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्व संभाव्य यंत्रणा शोधत आहोत. याबाबत रेड क्रॉससह इतर सवांदकांसोबत चर्चा सुरू आहे. सुमीत अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत काळजी आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचा मुद्दा रशिया आणि युक्रेनच्या सरकारसमोर मांडला आहे. दोन्ही देशांसोबत चर्चा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.