कोल्हापूर : पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शिक्षकांसाठी ‘एआय साथी’ हा ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंगचा प्रभावी, सुरक्षित आणि नैतिक वापर व्हावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. हा कोर्स ‘दीक्षा’ पोर्टलवर उपलब्ध आहे. शिक्षकांना 30 ऑक्टोबरपर्यंत या कोर्ससाठी नोंदणी करून 30 सप्टेंबरपर्यंत तो पूर्ण करणे आवश्यक आहे.
या प्रशिक्षणात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगची मूलभूत माहिती, अध्यापन अधिक प्रभावी कसे करावे, मूल्यमापन, शैक्षणिक आणि प्रशासकीय कामात एआयचा जबाबदारीने वापर कसा करावा याचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच एआय साधनांचा वापर करून नियोजन, अध्यापन आणि मूल्यमापन सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.
हा कोर्स शिक्षक स्वतःच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवरून पूर्ण करू शकतात. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी वर्षाला 50 तास CPD श्रेय बंधनकारक आहे. या अंतर्गतच हा कोर्स ठेवण्यात आला आहे. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना आणि प्राचार्यांना सर्व शिक्षकांकडून विहित मुदतीत हा कोर्स पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
