कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत विविध कारणे देऊन काही संस्थांना मतदानापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.

राजकीय सोयीसाठी काही संस्थांचा मतदानाचा हक्क नाकारला जात आहे. मात्र कोणतीही संस्था अपात्र ठरू नये, ही आमची भूमिका आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गोकुळच्या निवडणुकीबाबत आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील 10 दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार विहित मुदतीत निवडणूक घेणे बंधनकारक आहे, असेही पाटील म्हणाले.
गोकुळ कर्मचारी संघटनेने पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन केल्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले की, कर्मचारी संघटना स्वतंत्रपणे काम करते. त्यांनी त्यांच्या भूमिकेनुसार आंदोलन केले आहे.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महायुतीच्या माजी चेअरमन पाठिंबा देतील का, असा प्रश्न विचारला असता हा प्रश्न त्यांनाच विचारावा, असे सांगून पाटील यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले.
