पंढरपूर : आषाढी वारी 2026 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली.

शिंदे यांनी पत्रा शेड येथील रिद्धी-सिद्धी दर्शन मंडपातील रांगेतील भाविकांना स्वतः पाणी बॉटलचे वाटप केले. यावेळी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत भाविकांचा अनुभवही जाणून घेतला.
यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वैद्यकीय कक्षाचे शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी होडीमध्ये बसून चंद्रभागा नदीपात्रातील स्वच्छतेची पाहणी केली.
याचबरोबर भक्तीसागर येथे वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षास भेट देऊन शिंदे यांनी तेथील कामकाजाची पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी आयसीयू मध्ये दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर भक्तीसागर परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन व प्रशासन 24 तास दक्ष असून आषाढी वारी निर्विघ्न पार पडावी यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी महसूल राज्यमंत्री योगेश कदम, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, पंढरपूर नगराध्यक्ष प्रणिता भालके, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
