कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्य सेवा अधिक परिणामकारक व लोकाभिमुख करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या *राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघाची तिमाही आढावा बैठक* आज संपन्न झाली. या बैठकीस *आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर* यांची विशेष उपस्थिती होती.

बैठकीमध्ये राधानगरी, भुदरगड आणि आजरा तालुक्यातील आरोग्य सेवा सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, “आपला दवाखाना” तसेच इतर सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला.
यावेळी देण्यात आलेल्या सूचना:
– एमजेपीजेएवाय योजनेचे काम प्रभावीपणे राबवावे
– शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतींची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत
– कॅन्सरवरील तपासणीकरिता शिबिरांचे आयोजन करावे
– जिल्ह्यात स्मार्ट पीएचसी अंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे संकलन करून अहवाल द्यावा
– ग्राम पातळी तसेच इतर सर्व समित्यांचे कामकाज प्रभावीपणे करावे
या बैठकीस उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या क्षेत्रातील आरोग्यविषयक समस्या, ई-संजीवनी, टेली मेडिसिन, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि आरोग्य सेवांबाबत सूचना मांडल्या. त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीतील निर्णयांची कालबद्ध अंमलबजावणी करून त्याचा सविस्तर अनुपालन अहवाल पुढील तिमाही बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जि.प. बांधकाम व आरोग्य समिती सभापती सारिका नांदेकर, विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. रामजी आडकेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, जयश्री गाडे, जिल्हा परिषद सदस्य अरुणराव जाधव, अर्चनाताई निकम, रोहिणी आबिटकर, संयोगिता रणधीर मोरे, सागर धुंदरे, पंचायत समिती सदस्य सुनील किरोळकर, धनंजय लाड, माजी बाजार समिती संचालक कल्याणराव निकम, माजी सभापती बाबा नांदेकर, युवराज फगरे, प्रशांत देसाई यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
