राजर्ष शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर (चंबुखडी, ता. करवीर) येथील उच्चस्तरीय धोरण व सनियंत्रण समितीची बैठक दिनांक १०/०७/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता मा. सौ. शिल्पा खोत, अध्यक्षा, यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
सदर बैठकीमध्ये खालीलप्रमाणे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.मा. अध्यक्षांनी सदर बैठक अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करून निवासी क्रीडा प्रशालेची बैठक दर तीन महिन्यांनी आयोजित करावी, अशा सूचना दिल्या. तसेच मा. अध्यक्ष व शिक्षण सभापती यांनी निवासी मुला-मुलींसाठी सुसज्ज व सुरक्षित वसतिगृहाची इमारत बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समिती तसेच नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना दिल्या.
तसेच शिक्षण सभापती यांनी प्रशालेतील क्रीडा शिक्षक, पहारेकरी, रेक्टर व स्वच्छता कर्मचारी हे विविध यंत्रणांमार्फत कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले जात असल्याबाबत चर्चा केली. सदर सर्व मनुष्यबळासाठी स्वतंत्रपणे कंत्राट देण्याऐवजी एकाच सक्षम व्यवस्थापन संस्थेमार्फत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना करण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना अनुभवी क्रीडा शिक्षक, दर्जेदार भोजन व्यवस्था तसेच आवश्यक सुरक्षा कर्मचारी उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच भविष्यात काही अडचण अथवा वाद निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित करणे सुलभ होईल, असेही नमूद करण्यात आले.
तसेच सदर बैठकीमध्ये मुला-मुलींसाठी नवीन स्वच्छतागृहांची सुविधा, निवासी प्रशालेवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी वर्ग-२ दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती, निवासी क्रीडा प्रशालेतील विविध समित्यांवर नियुक्त्या, विद्यार्थ्यांचा विमा उतरविणे, नवीन क्रीडा व शैक्षणिक साहित्याची खरेदी आदी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीस सौ. शिल्पा खोत, अध्यक्षा; श्री. तानाजी पाटील, उपाध्यक्ष; सौ. शितल यादव, सभापती, शिक्षण व अर्थ समिती; सौ. सारिका नांदेककर, सभापती, बांधकाम व आरोग्य समिती; सौ. विद्या पाटील, सभापती, महिला व बाल कल्याण समिती; डॉ. जस्मिन, मुख्य कार्यकारी अधिकारी; मिनाक्षी शेंडकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक); अतुल आकुर्डे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी; मानसिंग पाटील, कार्यकारी अभियंता (बांधकाम) तसेच मुख्याध्यापक, मुख्य क्रीडा प्रशिक्षक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.
