तंबाखूमुक्त कोल्हापूरसाठी’कोटपा’ कायद्यांतर्गत धडक दंडात्मक कारवाई

कोल्हापूर : ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’चे औचित्य साधून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी व्यापक जनजागृती आणि दंडात्मक मोहिम राबविण्यात आली.

 

 

 

जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच ‘हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ या सर्व ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मोहिमेअंतर्गत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण, पालक आणि शिक्षकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या दुष्परिणामांची जाणीव करून देत, व्यसनापासून दूर राहण्याचे विशेष आवाहन केले होते. तसेच, कोल्हापूर आकाशवाणीवरून जिल्हा सिव्हिल सर्जन (प्रभारी) डॉ. सरिता थोरात यांची जनजागृतीपर विशेष मुलाखत प्रसारित करण्यात आली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे (NTCP) जिल्हा सल्लागार डॉ. व्ही. ए. आरळेकर यांनी ‘कोटपा’ (COTPA) कायद्याविषयी सविस्तर माहिती देऊन नागरिकांना सजग केले.

 

कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते ‘तंबाखूमुक्त व थुंकीमुक्त कोल्हापूर’ या विशेष अभियानाचा शानदार शुभारंभ करण्यात आला. या निमित्ताने शासकीय परिचर्या महाविद्यालयाच्या वतीने भव्य रांगोळी प्रदर्शन व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाभरात या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला असून, गडहिंग्लज येथील पंचायत समिती कार्यालय, तसेच शाहूपुरी व गांधीनगर पोलीस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष मौखिक आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली. कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे पोस्टर स्पर्धा, तर पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथे भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली. शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये रांगोळी व वक्तृत्व स्पर्धांसह उपस्थितांना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात आली.

 

केवळ जनजागृतीवर भर न देता, प्रशासनाने कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली. आरोग्य विभाग, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने शहरात धडक मोहीम राबवून एकूण ७,६०० रुपयांचा दंड वसूल केला. यामध्ये मध्यवर्ती बस स्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा व महाविद्यालय परिसरात २,६०० रुपयांचा तर गांधीनगर येथे सार्वजनिक ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि धूम्रपान करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत ५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोल्हापूर जिल्हा पूर्णपणे तंबाखूमुक्त करण्यासाठी नागरिकांनी व विशेषतः तरुण पिढीने या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रसंगी समुपदेशक चारुशीला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे व कार्यक्रम सहायक प्रियांका लिंगाडे उपस्थित होत्या.

 

 

🤙 8080365706