इन्फ्रारेड रेडिएशन अवरोधित करणाऱ्या स्वदेशी तंत्रज्ञानयुक्त उपकरणाला पेटंट

कोल्हापूर: डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूर येथे कार्यरत असलेले संशोधक डॉ. जयवंत गुंजकर यांना भारत सरकारच्या DST-SERB रामानुजन आणि कोअर प्रकल्पाअंतर्गत “लिक्वीड कॉलम बेस्ड ऑप्टिकल इन्फ्रारेड फिल्टर” या उपकरणासाठीचे पेटंट जाहीर झाले आहे. विद्यापीठाला मिळालेले हे ३९ वे पेटंट आहे.

 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांनी डॉ. जयवंत गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक व स्वदेशी वस्तूंचा वापर करून तयार करण्यात आलेल्या उपकरणासाठी भारतीय पेटंट प्राधिकरणाकडे जाने. 2021 साली अर्ज सादर केला होता. विविध चाचण्यांमधून आणि तब्बल ३ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांती हे पेटंट नुकतेच संशोधकाच्या नावे मंजूर केले गेले. त्यांच्या या संशोधनामुळे प्रकाश स्रोस्तापासून निघणारे अवरक्त किरण (इन्फ्रारेड रेडिएशन) अवरोधित करण्यासाठी मदत होणार आहे.

 

स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित बनविण्यात आलेल्या उपकरणाविषयी माहिती देताना डॉ. गुंजकर म्हणाले कि, आजकाल संपूर्ण जगामध्ये संशोधनाद्वारे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विविध पदार्थांचे विविध स्वरूपात संश्लेषण केले जाते. त्या पदार्थांचा वापर प्रकाश ऊर्जेच्या साहाय्याने पाण्याचे विभाजन, पाण्याचे शुद्धीकरण, ऊर्जा साठवणूक यासाठी करण्यात येत असतो. प्रकाश स्रोतमधून निघणाऱ्या घटाकांमध्ये अवरक्त किरण हा घटक असतो. या कार्यक्रमासाठी अवरक्त किरणांचा तयार केलेल्या पदार्थांवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता घटते. म्हणून अश्या प्रकारचे पदार्थाला हानिकारक असणारे किरण काढून टाकणे संशोधनामध्ये महत्त्वाचे मानले जाते. जागतिक बाजारामध्ये असे किरण काढून टाकण्यासाठीचे उपकरणांची किंमत जवळपास एक ते दोन लाख एवढी आहे. त्याला पर्याय म्हणून डॉ. गुंजकर आणि सहसंशोधक यांनी हे उपकरण फक्त 11 हजार रुपयांमध्ये बनविले आहे.

यासंबंधी अधिक माहिती देताना रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे म्हणाले कि, विकसित भारत बनविण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून अशी उपकरणे बनविणे काळाची गरज आहे. अशा पद्दतीने जर उपकरणे बनविली तर याचा फायदा संशोधक वर्गाला यापुढे होऊ शकतो.

या संशोधनामध्ये मुख्य संशोधक डॉ. जे. एल. गुंजकर यांच्यासमवेत योगेश चितारे, विकास मगदूम, आकाश पाटील व अभया पाटील यांचा समावेश आहे. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतेज डी. पाटील, संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, विश्वस्त तेजस पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.