अनिल देशमुखांना ‘हा’ मोठा दिलासा

मुंबई (वृत्तसंस्था) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुखांना अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. हृदय विकारानं त्रस्त असलेल्या देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास सत्र न्यायालयाने परवानगी दिली आहे.

अनिल देशमुख यांना नुकतंच ईडीने केलेल्या कारवाई प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.अनिल देशमुख यांनी आपल्याला अँजिओग्राफीसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावं अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणी घेताना मुंबई सत्र न्यायालयाने हे निर्देश दिले आहेत. 

अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप केला होता. हायकोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी सीबीआयनं प्राथमिक चौकशीनंतर अनिल देशमुखांसह अन्य काहीजणांविरोधात गुन्हा नोंदवला होता. याच एफआयआरवर ईडीकडून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी देशमुखांवर ईसीआयआर दाखल करण्यात आला आणि त्यांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करून त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. तेव्हापासून देशमुख सुमारे वर्षभर मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगातच आहेत.