जल शपथ घेवून कॅच द रेन अभियानाचा शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रिय जलशक्ती मंत्रालयामार्फत ‘कॅच द रेन’ अभियानाचा शुभारंभ आज मंगळवारी करण्यात आला. हे अभियान 29 मार्च ते 30 सप्टेंबर, 2022 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आज जल शपथ घेवून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयाच्या आवारात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत सर्व विभागप्रमुख तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांनी कॅच द रेन जल शपथ घेतली.

या अभियान अंतर्गत सर्व ग्राम पंचायतींमध्ये 1 ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार आहे. जलशक्ती अभियान अंतर्गत विविध योजनांचे अभिसरण करून विकास आराखडा तयार करणेसाठी या विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात येणार असून ग्रामसभेमध्ये जलशपथ घेणे, पावसाचे पाणी संकलन करणे, पाणी स्त्रोतांची गणना करणे, पारंपारिक पाणी स्त्रोतांचे बळकटीकरण करणे, बंद असणारे पाणी स्त्रोत नव्याने सुरू करणे व त्याचा पुनर्वापर करणे. पाणलोट क्षेत्राचा विकास करणे, जलसंधारणाची नवीन कामे सुरू करणे, हरितक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने वनीकरण करणे या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

‘कॅच द रेन’ अभियानामध्ये सर्व ग्राम पंचायतींनी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा आणि अभियान यशस्वी करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी केले आहे.