घरफाळा दंडामध्ये ५० टक्के सवलत योजनेचे शेवटचे २ दिवस शिल्लक

कोल्हापूर : शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केलेस दंडव्याजामध्ये महापालिकेच्यावतीने सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेचे शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले आहे. हि सवलत योजना दि. 24 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 अखेर असून निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 50 टक्के व दि.16 फेब्रुवारी ते 15 मार्च 2024 अखेर निवासी/अनिवासी मिळकतीसाठी 30 टक्के सवलत योजना देण्यात आलेली आहे.

या योजनेस दिनांक 24 जानेवारी 2024 ते 12 फेब्रुवारी 2024 अखेर शहरातील मिळकतधारकांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. या सवलत योजनेमध्ये शहरातील 4764 लाभार्थ्यांनी आजअखेर लाभ घेतला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेला थकीत 5 कोटी 39 लाख इतका घरफाळा वसूल झाला आहे. 50 टक्के सवलत योजनेमधून नागरिकांना 1 कोटी 26 लाख 01 हजार 26 रूपयांची सवलत मिळाली आहे.

तरी 50 टक्के सवलत योजनेचे शेवटचे तीन दिवस राहिले असल्याने नागरिकांनी चालू बिलासह थकीत रक्कम एकरकमी रोख, धनादेश, डिमांड ड्राफटव्दारे, ऑनलाईन सिस्टीम व्दारे (फोन पे,गुगल पे,मोबाईल वॉलेट द्वारे) भरुन या योजनेचा लाभ घ्यावा. ही रक्कम महापालिकेच्या सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये कार्यालयीन वेळेत भरता येईल. तरी संबंधीत सर्व मिळकतधारकांनी या सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.