पालकमंत्र्यांची दडपशाही खपवून घेणार नाही : धनंजय महाडिक यांचा इशारा

कोल्हापूर : पालकमंत्री गोरगरीब जनतेला आणि भाजप कार्यकर्त्यांना धमकावून दडपशाही करत आहेत. पोलीस आणि शासकीय यंत्रणेवर दबाव आणून निरपराध कार्यकर्त्यांना त्रास देत आहेत. सत्तेचा दुरुपयोग करून आणि उन्माद दाखवून सर्वसामान्य नागरिकांना आणि भाजप कार्यकर्त्यांना त्रास होणार असेल तर ते खपवून घेणार नाही, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ कनाननगर येथे सभा घेण्यात आली. या सभेला नागरिकांची प्रचंड उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना माजी खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांचा खरपूस शब्दांत समाचार घेतला.

महाडिक म्हणाले, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. त्यांचा बिनविरोध निवडणूक लादण्याचा डाव होता. पण भाजपसह 15 उमेदवार लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत आहेत. आपला डाव यशस्वी झाला नाही म्हणून बिथरलेले विरोधक दडपशाही करणार असतील, तर कोल्हापूरची जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. भाजपाला पाठिंबा देणाऱ्या समाजातील विविध घटकांना, मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक फोन करून धमक्या देत आहेत. त्यातून त्यांचा रडीचा डाव दिसून येतोय. पालकमंत्री पदाचा गैरवापर करत असून, याबाबतची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांनी कोल्हापूर उत्तरचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी मायबाप जनतेने पाठबळ द्यावे असे आवाहन केले.

यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे, शोमिका महाडिक, गायत्री राऊत, विजय जाधव, महेश जाधव, आशिष कपडेकर, नजीर देसाई यांच्यासह विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.