कोल्हापूर उत्तरमध्ये जनताच परिवर्तन घडवणार : धनंजय महाडिक

कोल्हापूर : निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराला वैतागलेली जनता कोल्हापूर उत्तरमध्ये परिवर्तन घडवणार, असा ठाम विश्वास माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तरचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्या प्रचारासाठी शाहूपुरी मंडलमधील कार्यकर्त्यांच्या घेण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.

महाडिक म्हणाले, कोल्हापूर उत्तर मतदार संघातून जिल्हयात परिवर्तनाची सुरूवात होणार आहे. महाविकास आघाडी सरकारचे अपयश आणि भ्रष्टाचारी कारभार यामुळे जनता वैतागली आहे. अशावेळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघरी जाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयांची माहिती दयावी. तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कामगिरी किती सरस आहे, हे लोकांसमोर आणावी.

ते पुढे म्हणाले, भाजप हा संघटनात्मकरित्या अत्यंत शिस्तबध्द आणि रूजलेला पक्ष आहे. संघभावना, एकता आणि पक्षाचा आदेश प्रमाण मानून काम करणारी कार्यकर्त्यांची मोठी फौज ही भाजपची जमेची बाजू आहे. गेल्या अडीच वर्षातील महाविकास आघाडी सरकारची निष्क्रियता, मंत्र्यांचे घोटाळे, तीन पक्षातील अंतर्गत लाथाळया यामुळे महाविकास आघाडी सरकारबद्दल जनतेच्या मनात नाराजी आहे. दोन्ही कॉंग्रेसच्या मागून शिवसेनेची फरफट होत आहे. यापूर्वी राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने पारदर्शी कारभार केला. देवेंद्र फडणवीस यांनी लोकहिताचे अनेक निर्णय घेतले. केंद्रातील मोदी सरकारने तर धडाकेबाज कामगिरी करून, लोकांची मने जिंकली आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर जनतेचा पुर्ण विश्‍वास आहे. त्यामुळेच कोल्हापूर उत्तरमध्येही आता परिवर्तन अटळ असल्याचे धनंजय महाडिक यांनी सांगितले.

माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, कोल्हापूर शहराचे प्रश्‍न सोडवण्यासाठी सत्यजित कदम यांच्यासारखा अभ्यासू आणि भ्रष्टाचाराला विरोध करणारा उमेदवार निवडला पाहिजे, असे आवाहन केले. कोल्हापूर महापालिकेत आपली छाप पाडणार्‍या सत्यजित कदम यांना आता जनता आमदार करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे आणि या निवडणुकीत भाजपची ताकद दाखवावी, असे सांगून कार्यकर्त्यांना रिचार्ज केले.

यावेळी शैलेश पाटील, संतोष भिवटे, आप्पा लाड, विद्या पाटील, उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांच्यासह शाहूपुरी मंडलमधील कार्यकर्ते उपस्थित होते.