किणी किंवा कोगनोळी टोलनाका बंद होणार?

कोल्हापूर : किणी किंवा कोगनोळी टोलनाका बंद होण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्गावरील ६० किमी अंतराच्या आतमध्ये टोल असणार नाही, अशी घोषणा मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली होती. त्याआधारे ४३ किलोमीटर अंतर असल्याने किणी किंवा कोगनोळी यापैकी एक टोलनाका बंद होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक गावांनाही सूट मिळणार आहे.

आता त्यावर आंतरराज्य सीमेवरील टोल नाक्यांना ६० किमीच्या अंतराचा कायदा लागू असेल अस केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यातण्यात आले आहे. नॅशनल हायवे टोल अधिनियमानुसार साठ किलोमीटरची मर्यादा लागू आहे. पण २००८ च्या आधीचे काही टोल असू शकतात. त्याबाबत अभ्यास करावा लागेल अशी भूमिका मंत्रालयाने घेतली आहे. स्थानिकांना पास बाबत जी सूट मिळणार त्यासाठी शहरी भाग वगळता दहा किलोमीटर पर्यंत असू शकते. कमीत कमी पाच किलोमीटर अंतरावरच्या गावांना ही सूट लागू असेल. स्थानिक नागरिकांच्या ओळखीसाठी आधारकार्ड हे गृहीत धरलं जाणार आहे.

  ज्या ठिकाणी एकच महामार्ग असेल आणि त्या ठिकाणी दोन राज्यांचे दोन टोल ६० किमी अंतरामध्ये येत असतील तर ते बंद करण्यात येतील. कारण नियमात टोल नाक्यांना ६० किमीच्या किमान अंतराचा कायदा लागू होत आहे. त्याआधारे किणी किंवा कोगनोळी यापैकी एक टोलनाका बंद होण्याची शक्यता आहे. कारण किणी ते कोगनोळी टोलनाक्यातील अंतर ४३ किलोमीटर आहे.