ऐतिहासिक माणगांव परिषदेची शताब्दी साजरी करावी : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) :ऐतिहासिक माणगांव परिषदेची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी झाला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाविकास आघाडीने करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. त्याचबरोबर विश्‍वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करुन एक विचारपीठ तयार करावे,  असेही आमदार आवाडे म्हणाले.

 आमदार आवाडे म्हणाले, २१ व २२ मार्च १९२० रोजी हातकणंगले तालुक्यातील माणगांव येथे ऐतिहासिक परिषद झाली होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेल्या परिषदेला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी शाहू महाराजांनी डॉ. आंबेडकर यांच्यात वंचित, शोषित, दलित यांचे नेतृत्व करण्याची क्षमता असून त्यांना साथ द्यावी, असे सांगितले होते. त्या ऐतिहासिक माणगांव परिषदेची शताब्दी साजरी करण्याचा निर्णय २०२० मध्ये शासनाने घेतला होता. परंतु कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे ती साजरी करता आली नाही. आता कोरोना संपला असून महाविकास आघाडी शताब्दी साजरी करणार आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला. त्याचबरोबर त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार डॉ. आंबेडकर यांचे नांवे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करुन एक विचारपीठ तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्याचीही अंमलबजावणी होणार आहे की नाही. हा विषय अर्थखात्याशी संबंधित असून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली.