भगवंत मान पंजाबचे नवे मुख्यमंत्री

चंदीगड :  पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांचा आज शपथविधी झाला. मान हे पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री असून शहीद भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकड कलान येथे पंजाबी भाषेत त्यांनी शपथ घेतली. राज्यपाल बीएल पुरोहित यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यानंतर भगवंत मान यांनी भाषण करून इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या.

शपथ घेतल्यानंतर भगवंत मान म्हणाले, काही तारखांनाच हुतात्म्यांचे स्मरण का केले जाते? त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण रोज चालले पाहिजे. कोणत्याही प्रकारचा अहंकार बाळगू नका. वेळ आणि जनता ही मोठी गोष्ट आहे. माणसाला जमिनीवर आणायला ते उशीर करत नाहीत. बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेती, व्यवसाय, शाळा, रुग्णालये सर्व काही ठीक होईल. येथे राहून आम्ही पंजाबचे भले करू.

  शपथविधी सोहळ्यासाठी १०० एकर जागा आरक्षित केली होती. चाळीस एकर जागेवर पार्किंगची व्यवस्था केली होती. तर शपथविधीसाठी १३ एकर जागेत मंडप उभारला होता. त्यात तीन प्लॅटफॉर्म बनवले होते. पहिल्या व्यासपीठावर मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यपाल बीएल पुरोहित होते. दुसऱ्या व्यासपीठावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे मंत्रिमंडळ बसणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर पंजाबच्या सर्व  आमदारांसाठी बैठक व्यवस्था केली होती.. सुरक्षेसाठी सुमारे 10,000 जवान तैनात करण्यात आले आहेत. 
   भगवंत मान १२.३० वाजता शपथ घेणार होते, मात्र ते ५० मिनिटे उशिराने पोहोचले. खराब हवामानामुळे त्यांना खटकड कलानला पोहोचण्यास उशीर झाला. भगवंत मान आता पंजाबचे १७ वे मुख्यमंत्री बनले आहेत. तथापि कार्यकाळाच्या दृष्टीने ते पंजाबचे २५ वे मुख्यमंत्री आहेत.