कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्या कार्यमुक्तीला विरोध दर्शवत जिल्हा परिषदेच्या आवारातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उपोषणाचा निर्णय काही सदस्यांनी घेतला होता. मात्र आज मंगळवारी अध्यक्ष राहुल पाटील यांनी या सदस्यांना उपोषणाला बसू नये याबाबत पत्र पाठवले. अध्यक्षांच्या पत्राला मान देऊन सदस्यांनी उद्या बुधवारी होणाऱे उपोषण स्थगित केले आहे.
उपोषणाला बसणाऱ्या सदर सदस्यांनी अध्यक्षांना एक पत्र पत्र पाठवून असे म्हटले आहे की आपण कार्यमुक्तीच्या आदेशास स्थगीत करणेचे घोषीत केले होते. परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही. परीणामी बुधवार १६ मार्च रोजी सकाळी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यासमोर उपोषणास बसणार होतो. मात्र आपण धोंगे यांच्यावरील कारवाईचा आदेश रदद केला जाईल असे अभिवचन दिल्यामुळे सदरचे उपोषण आम्ही काही काळासाठी स्वगीत करीत आहोत.
अध्यक्षांना दिलेल्या पत्रात सदस्य शिवाजी मोरे, भगवान पाटील, राजवर्धन नाईक निंबाळकर, प्रवीण यादव ,प्रसाद खोबरे, विजय भोजे, अशोकराव माने, वंदना मगदूम ,अनिता चौगुले, विशांत महापुरे ,मनीषा टोणपे आदींच्या सह्या आहेत.
अध्यक्ष पाटील यांनी सदस्यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, 9 मार्च रोजी झालेली सभाही सर्वसाधारण सर्वसाधारण नसून अर्थसंकल्पीय विशेष सभा होती. सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावनांचा आदर करुन व सभागृहाचे कामकाज सुरळीत चालू राहण्याकरीता मी पीठासीन अधिकारी या नात्याने धोंगे यांच्या कार्यमुक्ती आदेशास स्थगीती देण्याबाबत प्रशासनास सुचना दिल्या होत्या. तथापि, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ कलम १११ (८) नुसार पीठासीन अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय घेण्यात आल्याशिवाय ठराव संमत झाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत त्यात फेरबदल करण्यासाठी किंवा तो रद्द करण्यासाठी आणलेल्या प्रस्तावाच्या किंवा प्रतिपादनाच्या बाबतीत अशी परवानगी देण्यात येणार नाही. अशी तरतूद असलेने व ९ मार्चची विशेष सभा असलेने याबाबत प्रशासनाकडून कायदेशीर अभिप्राय मागणी करणेत आलेले आहेत. सदर अभिप्राय प्राप्त होताच आपले व सभागृहाचे मागणीनुसार अंतिम निर्णय घेणेत येत आहे. तरी उद्या उपोषणास बसू नये याबाबतचे पत्र सदस्यांना पाठवले आहे.