जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतात. आता नाभिक समाजाबद्दल केलेले त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या अंगलट येणार, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याविरोधात नाभिक समाज आक्रमक झाला असून तसेच रावसाहेब दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना या सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाल्याचे सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसे आघाडी सरकार करतेय, अशी टीका केली होती. त्यामुळे जालनातील नाभिक समाजाने एकत्र येत नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या अध्यक्षतेखाली जालन्यातील मामा चौकात आंदोलन केले. तसेच दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला २१ हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यावेळी जालन्यासह राज्यभरातून दानवे यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला जात आहे. तसेच दानवे यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन उभारु असा इशाराही त्यांनी देण्यात आला आहे.