इचलकरंजीत दोन चौकांत सिग्नल सुरू; मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत कार्यवाही केल्याने इचलकरंजीतील के. एल. मलाबादे चौक आणि डेक्कन चौकांतील सिग्नल यंत्रणा सुरळीत झाली आहे. शिवतीर्थ चौक, राजर्षी शाहू महाराज पुतळा चौक, झेंडा चौक व थोरात चौक या ठिकाणीही लवकरच सिग्नल यंत्रणा सुरू करण्यात येईल असे मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.

  शहरात सध्या मलाबादे चौक, प्रांत कार्यालय चौक व राजवाडा चौक येथे जुनी सिग्नल यंत्रणा आहे. पैकी राजवाडा चौकातील सिग्नल यंत्रणा तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. मलाबादे चौक व प्रांत कार्यालय चौक येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड निर्माण झाल्याने ही यंत्रणा बंद पडली होती. याबाबत पालिकेकडे अनेकवेळा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे वाहतुकीमध्ये विस्कळीतपणा आला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी ठेंगल यांनी सिग्नल यंत्रणा दुरुस्त करण्याच्या सूचना विद्युत विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार दोन्ही महत्त्वाच्या चौकातील सिमल यंत्रणेची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्याची पाहणी मुख्याधिकारी ठेगल यांच्यासह शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास आडसुळ, विद्युत अभियंता संदीप जाधव यांनी पाहणी केली.

   यावेळी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांनी नागरिकांनीसिग्नल यंत्रणेचे तंतोतंत पालन करुन वाहतूक सुरळीत होणेस सहकार्य करावे, असे आवाहन केले.