कोल्हापूर : डॉ. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ शनिवारी ( दि. १२) होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार असून कुलपती डॉ. संजय डी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . डी. टी. शिर्के प्रमुख पाहुणे आहेत.
मुदगल म्हणाले, यंदाचा दीक्षांत समारंभ हॉटेल सयाजी येथे होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांना डी. लिट. तर ज्येष्ठ वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. एस. आर. यादव यांना डी. एस्सी. पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे असे सांगून डॉ. मुदगल म्हणाले की, या समारंभात ३६१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. तसेच ९ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार असून डॉ. धनाजी माळवेकर यांना ‘एक्सलन्स इन रिसर्च’ म्हणून सन्मानित केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू डॉ. शिंपा शर्मा म्हणाल्या की, विद्यापीठाने गेल्या दहा वर्षात शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून सलग दुसऱ्यांदा नॅकचे “अ” मानांकन प्राप्त केले आहे.
पत्रकार बैठकीला विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर संजय डी. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. ए. एन. जाधव, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते