कोरोचीकरांना मिळणार मुबलक पाणी

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामस्थांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोरोचीसाठी दोन कोटी रुपये खर्चाची नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे.
या योजनेसाठी आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नातून ही योजना मंजूर झाली आहे.
या योजनेमुळे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील कोरोची गावाला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न संपुष्टात येणार आहे. त्यामुळे पाण्यासाठी गावातील महिला आणि लहान मुलांची वणवण थांबणार आहे. कोरोची गावात ही योजना व्हावी यासाठी शासन दरबारी आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. कोरोची गावासाठी दोन कोटी रुपयांची ही योजना आहे. या योजनेच्या कामाची निविदा प्रसिध्द झाली असून लवकरच ही योजना पूर्ण होऊन कोरोची गावचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे.