बारावीच्या परीक्षेला प्रारंभ; विद्यार्थ्यांसह पालक भाऊक!

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आज पासून प्रारंभ झाला. दोन वर्षांनंतर ऑफलाईन परीक्षा होत असल्याने विद्यार्थी व पालक भाऊक होते. तर शाळांचा परिसर गर्दीने फुलून गेला होता.

इंग्रजीचा पहिला पेपर असल्याने सकाळी नऊ वाजताच परीक्षार्थी व पालक परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. बहुतांश विद्यार्थ्यांचे नातेवाईक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर उपस्थित होते. परीक्षार्थी विद्यार्थी आपल्या मित्र- मैत्रिणींना परीक्षेसाठी शुभेच्छा देत होते. इंग्रजीचा पेपर कसा असेल याची चर्चा करत होते.

गेल्यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली होती व अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज इंग्रजी विषयाच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ झाला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था संबंधित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातच करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र पाहून वर्गात सोडण्यात येत होते. प्रत्येक विद्यार्थ्याला सॅनिटायझर लावून वर्गात प्रवेश दिला जात होता. एका वर्गात जास्तीत जास्त पंचवीस मुलांची आसन व्यवस्था करण्यात आली होती.