केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतली भेट

कागल : केंद्राने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रनाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी इथेनॉलला आधारभूत किंमत देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी दिल्ली येथे भेट घेतली.
देशातील शिल्लक साखरेचा साठा कमी व्हावा, इंधनाच्या परदेशातून होणाऱ्या आयातीवरील देशाचे अवलंबित्व कमी व्हावे, तसेच त्यावर खर्ची पडणाऱ्या परकीय चलनात कपात करण्याकरता केंद्र सरकारने या वर्षाअखेर पेट्रोलमध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यासाठी देशातील ऑईल कंपन्यांनी एकत्रित ४५८ कोटी लिटर्स इथेनॉल खरेदीची निविदा प्रसिद्ध केली आहे.या निविदेला देशातील इथेनॉल निर्मिती उद्योगांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.शाहू कारखानाही मागील हंगामापासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करीत आहे. इथेनॉलची भविष्यातील वाढती मागणी विचारात घेऊन इथेनॉल निर्मिती मध्ये वाढ करण्याचे शाहू कारखान्याचे धोरण आहे. जेणेकरून याचा जास्तीत जास्त आर्थिक फायदा शाहू कारखान्यास कसा करून घेता येईल.हा दृष्टिकोन ठेवून घाटगे यांनी त्यांची भेट घेतली.
यावेळी पेट्रोल व डिझेल इंजिन वापर कमी करण्यासाठी सीएनजी गॅस व इथेनॉल निर्मिती व त्याचा वापर याबाबत चर्चा झाली. केंद्र शासनाने या दोन्ही इंधनाच्या वापराबाबत प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर केले आहे.त्यानुसार शाहू साखर कारखान्यामार्फत सीएनजीचलित ट्रॅक्टर प्रात्यक्षिक तसेच शेतीमध्ये औषध फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रात्यक्षिक घेण्यात आले असून सभासद शेतकऱ्यांसाठी या दोन्ही योजना प्रभावीपणे राबवणार असल्याची सविस्तर माहिती घाटगे यांनी मंत्री मा.गडकरी यांना दिली. शाहूच्या या आधुनिक तंत्राच्या वापराच्या धोरणाचे मंत्री गडकरी यांनी कौतुक केले.
गडकरी म्हणाले, भविष्यात इथेनॉल व सीएनजी गॅसवर चालणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रोत्साहन देण्याचे केंद्राचे धोरण राहणार आहे .त्यामुळे साखर कारखान्यांनी साखरेशिवाय अशा उत्पादनांकडे वळणे आवश्यक असल्याचे मंत्री गडकरी यांनी स्पष्ट केले. त्यानुसार शाहू साखर कारखाना त्यासाठी सकारात्मक आहे. इथेनॉल व सीएनजी गॅस पुरवठ्यासाठीच्या एजन्सीसाठी उत्सूक असल्याचे घाटगे यांनी स्पष्ट केले.