कोल्हापूरच्या रेल्वे प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा : पालकमंत्री

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसमधील विविध प्रश्नांसंदर्भात पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी, उपव्यवस्थापक दिव्यकांत चंद्राकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मध्यवर्ती बसस्थानक आणि राजारामपुरी परिसराला जोडणाऱ्या प्रस्तावित रेल्वे ओव्हर ब्रिजचे नियोजन कसे करता येईल, प्लॅटफॉर्म क्रमांक ४, ५ ,६ चे विस्तारीकरण, फ्लॅटफॉर्मची लांबी आणि विद्युतीकरणाचा विस्तार तसेच परीख पुलाबाबतही चर्चा झाली.

 पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर – पुणे, कोल्हापूर – सातारा, कोल्हापूर – मिरज दरम्यान डेम्यू गाड्या चालवणे, कोल्हापूर – पुणे दरम्यान दुहेरीकरणाचे काम आणि विद्युतीकरणाला गती देण्याबाबतही सकारात्मक चर्चा. कोल्हापूर हे उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने राज्यातील एक प्रगत शहर आहे. तसेच अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. या बाबींची दखल घेऊन महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये आणखी एका एसी डब्याची मागणी केल्याची माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, कोल्हापूर – अमृतसर, कोल्हापूर-गुवाहाटी, कोल्हापूर – जयपूर, कोल्हापूर – कलबुर्गी दरम्यान नवीन गाड्यांची तरतूद करण्यासोबतच सह्याद्री एक्स्प्रेस, कोल्हापूर – सोलापूर, कोल्हापूर – हैदराबाद, कोल्हापूर – बिदर या स्थगित गाड्यांची सेवा पूर्वरत सुरू करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले.