नवी दिल्ली वृत्तसंस्था : आज जगातला एकही देश कोरोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे कोरोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, कोरोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधं हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो अशी भिती जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.
पुढे बोलताना डॉ. टेड्रॉस म्हणाले की, कोरोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल. जर आपण आपल्यातली असमानता नष्ट केली, तर आपण हे कोरोनाचं संकट देखील नष्ट करू शकू. आपण कोरोना साथीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतोय की आपण याच वर्षी कोरोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तर असं टेड्रॉस म्हणाले.