न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या माजी गृहमंत्र्यांचे नितीन गडकरींनी मानले आभार

नागपूर प्रतिनिधी : १०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आभार मानले आहेत. काटोल नगर परिषदेच्या वतीने आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमावेळी केंद्रीय नितीन गडकरी यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आभार मानले.

“नागपूर ते काटोल या चौपदरी रस्त्याचा आज शुभारंभ झाला आहे. या रस्त्यासाठी अनेक अडचणी आल्या. वनविभागाने हा वाघांच्या जाण्याचा मार्ग असल्याचे सांगितले. माझा जन्म तुमच्या आधी झाल्याचे मी त्यांना म्हटले. इतक्या वर्षात इथे कोणत्या गावात वाघ शिरला नाही तर तुम्ही कुठे घुसवत आहात. त्रास द्यायचे काम कशाला करता. अनिल देशमुखांनी मदत केली तेव्हा वनविभागाची परवानगी मिळाली. नाहीतर मिळतचं नव्हती. या रस्त्याकरता त्यांचेही मी आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये सगळ्या अडचणी दूर करुन हा रस्ता पूर्ण होणार आहे. नागपूरमध्येही रस्ता चौपदरी करण्यात येणार आहे,” असे नितीन गडकरी म्हणाले.