कोल्हापूर: कोल्हापूरच्या ऐतिहासिक ओळख असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या प्रकरणात आता नवे धक्कादायक तपशील समोर आले आहेत.

सुमारे दीड वर्षांपूर्वी दुर्घटनेत भस्मसात झालेले हे नाट्यगृह नेमके जळाले की जाळले गेले, यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
फॉरेन्सिक तपास पथकाने घटनास्थळावरून 28 नमुने संकलित केले होते. त्यापैकी 3 नमुन्यांच्या तपासणीत आग भडकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे अंश आढळल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. यामुळे पोलीस यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहेत.
पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, या आगीत सुमारे 18 कोटी 90 लाख रुपयांचे नुकसान झाले होते. दुर्घटनेला दोन वर्षे पूर्ण होत आली तरीही अद्याप या प्रकरणी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
नाट्यगृह कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतिक होते. 8 ऑगस्ट 2024 रोजी ही भीषण आग लागली होती. आता फॉरेन्सिक अहवालामुळे तपासाला गती मिळण्याची शक्यता आहे.
