दहा लाखांच्या खंडणीसाठी धमकी; रविकिरण इंगवलेसह पाच जणांवर गुन्हा विकासकाम बंद पाडण्याची व जीवे मारण्याची धमकी; साडेचार लाख रुपये घेतल्याचा तक्रारीत आरोप

कोल्हापूर : डेव्हलपमेंटचे काम सुरू ठेवण्यासाठी दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा तसेच पैसे न दिल्यास काम बंद पाडून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या तक्रारीवरून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह फारुख बाबू खान, आनंद पाटील आणि अन्य दोन साथीदारांविरोधात पोलिसांनी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

गडहिंग्लज येथील खुतबुद्दीन गैबिसो शेख यांनी याबाबत तक्रार दिली आहे. शेख यांनी कोल्हापूर शहरातील हरी ओमनगर परिसरातील सर्व्हे नं. १०९३ मधील सुमारे आठ एकर जागा विकसनासाठी घेतली असून, तेथे विकासकाम सुरू केले होते.

तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये शेख हे त्यांच्या मित्रासोबत विकासाच्या ठिकाणी असताना पाच जण कारमधून तेथे आले. रविकिरण इंगवले यांच्या परवानगीशिवाय काम कसे सुरू केले, असा सवाल करत इंगवले यांच्याशी विषय मिटविण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर फारुख खान याच्या मोबाईलवरून इंगवले यांच्याशी शेख यांचे बोलणे झाले. यावेळी काम सुरू ठेवायचे असल्यास दहा लाख रुपये देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास महापालिकेकडे तक्रार करून काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप शेख यांनी केला आहे.

यानंतर महापालिकेकडे त्यांच्या विकासकामाविरोधात तक्रार करण्यात आली. महापालिका अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शेख यांनी आवश्यक कागदपत्रे व अर्जाची पोहोच दाखविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर झाडे तोडल्याच्या आरोपावरूनही तक्रार करण्यात आली होती.

तक्रारीनुसार, त्यानंतर फारुख खान, आनंद पाटील यांच्यासह पाच जण शेख यांच्या साईटवर गेले. दहा लाख रुपये दिल्याशिवाय काम सुरू करू नये, असे सांगत त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करण्यात आली. तसेच काम सुरू केल्यास जिवंत ठेवणार नसल्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

धमक्यांमुळे घाबरलेल्या शेख यांनी जानेवारी २०२६ मध्ये १ लाख ५० हजार रुपये, फेब्रुवारीमध्ये १ लाख रुपये आणि ऑगस्ट २०२६ मध्ये २ लाख रुपये, असे एकूण ४ लाख ५० हजार रुपये फारुख खान याच्याकडे दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, उर्वरित रक्कम देण्यासाठी धमक्या कायम राहिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ऑगस्टमध्ये चार लाख पन्नास हजार रुपये दिल्यानंतर यापुढे पैसे देणे शक्य नसल्याचे शेख यांनी सांगितले. त्यावेळी फारुख खान याने रविकिरण इंगवले यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. काम सुरू केल्यास साईटवरच काम तमाम करण्याची धमकी इंगवले यांनी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या धमक्यांमुळे विकासाचे काम बंद ठेवावे लागल्याने आर्थिक नुकसान झाल्याचे शेख यांनी म्हटले आहे. तसेच दहशतीमुळे तक्रार देण्यास विलंब झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या प्रकरणी रविकिरण इंगवले, फारुख बाबू खान, आनंद पाटील यांच्यासह अन्य दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

🤙 8080365706