१३ उमेदवारांची माघार; तीन जागा बिनविरोध, १४ जागांसाठी ४४ जण रिंगणात

कोल्हापूर:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. १७ पैकी तीन जागांवर बिनविरोध निवड निश्चित मानली जात असून उर्वरित १४ जागांसाठी आता ४४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात कायम आहेत.

 

 

 

यापूर्वी विविध गटांतून एकूण ६० उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र काही गटांमध्ये एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. संकलन गटातून विजय खोचीकर आणि गायक-संगीत गटातून आदर्श शिंदे यांचे अर्ज एकमेव राहिल्याने त्यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

उमेदवारी अर्ज माघारीची मुदत २८ मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत होती. विविध गटांत बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. त्यापैकी तीन गटांमध्ये यश आले असून उर्वरित गटांत थेट निवडणूक होणार आहे.

दरम्यान, कला दिग्दर्शन गटातून अमर मोरे, छायाचित्रण गटातून बाबा लाड, निर्माता-अभिनेता गटातून आकराम पाटील, कामगार गटातून बाळकृष्ण बारामती, निर्माता गटातून गणेश शिंदे, अभिनेता गटातून धर्मेंद्र यादव, अर्जुन नलवडे, महादेव साळोखे, सुभाष गुदेशा, प्रदीप कोतमिरे, श्याम लोंढे तसेच अभिनेत्री गटातून नीलम शिर्के यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

अभिनेत्री गटातील माघारीमुळे त्या गटातील निवडणुकीची समीकरणे बदलल्याची चर्चा आहे. तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत यंदा ३४०३ सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ७ जून रोजी मतदान होणार असून ८ जूनला मतमोजणी केली जाणार आहे.

🤙 8080365706