कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसानंतर शनिवारी (११ जुलै) जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाल्यांच्या पाणीपातळीतही घट होण्यास सुरुवात झाली आहे.

आज सकाळी पंचगंगा घाटावरील पाणी पूर्णपणे नदीपात्रात परत गेल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी २५.०८ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नदीच्या पाणीपातळीत हळूहळू घट होत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र, पाणीपातळी कमी होत असली तरी जिल्ह्यातील १६ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत. त्यामुळे या मार्गांवरील वाहतूक अद्याप बंद असून नागरिकांनी बंधाऱ्यांवरून जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामानात काहीशी उघडीप मिळाल्याने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी पुढील काही दिवस हवामानातील बदल लक्षात घेता सतर्क राहण्याची गरज आहे. प्रशासनाकडून नदीपात्र, धरणे आणि बंधाऱ्यांवरील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना सुरू आहेत.
