कोल्हापूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षीय भेद बाजूला ठेवून सर्व सदस्यांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन महापौर सौ. रूपाराणी निकम यांनी केले. कोल्हापूर महानगरपालिका व अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या.

महानगरपालिकेच्या कामकाजात सुसूत्रता, पारदर्शकता आणि कायदेशीर बाबींचे सखोल ज्ञान नवनिर्वाचित सदस्यांना व्हावे, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी प्रशासन व नागरिकांतील समन्वय, महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीचे पर्याय तसेच ७४ व्या घटनादुरुस्तीच्या तरतुदी या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. निवृत्त उपआयुक्त तथा मानद संचालक लक्ष्मण लटके, पिंपरी-चिंचवडचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदुलकर आणि निवृत्त प्रशासनाधिकारी प्रभाकर पत्की यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी सदस्यांच्या विविध प्रश्नांचे निरसनही करण्यात आले.
महापौर सौ. निकम म्हणाल्या, गेल्या दोन दिवसांत सदस्यांना सभागृहातील कामकाजाची पद्धत, नियम व कायदे यांची उपयुक्त माहिती मिळाली असून शहराच्या विकासासाठी या प्रशिक्षणाचा निश्चितच लाभ होईल.
विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी प्रशिक्षणामुळे सदस्यांना कायदेविषयक बाबी, सभागृहातील कार्यपद्धती तसेच जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे व सोडविण्याचे कौशल्य प्राप्त झाल्याचे सांगितले.
सभागृह नेते मुलीधर जाधव यांनी सांगितले की, या प्रशिक्षणामुळे सदस्यांना सभागृहातील कामकाज अधिक प्रभावीपणे करता येईल. तसेच जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करताना या ज्ञानाचा निश्चितच उपयोग होणार असून, त्यातून सदस्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गटनेते आदिल फरास यांनी नमूद केले की, महापौरांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण नवनिर्वाचित सदस्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरले आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेचे कामकाज सुलभपणे समजण्यास मदत झाली असून, विद्यमान सदस्यांनाही कायद्यातील नव्या तरतुदींची माहिती मिळाल्याने त्यांच्या कार्यात अधिक परिणामकारकता येईल.
गटनेते इंद्रजीत बोंद्रे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना महापालिकेतील कामकाज, सभागृहात प्रश्न मांडण्याची पद्धत आणि विविध कायदेशीर तरतुदींची सखोल माहिती या प्रशिक्षणातून मिळाल्याचे सांगितले. हे उपयुक्त प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल त्यांनी प्रशिक्षणार्थी तसेच महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले.
समारोपप्रसंगी उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. कौसर बागवान, उपसभापती सौ. दिपा ठाणेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, विविध प्रभाग समित्यांचे सभापती, गटनेते तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.
