कोल्हापूर : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत तसेच विविध पक्ष संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारचे आंदोलने करण्यात येतात. तसेच विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असून दि. 22 ऑक्टोबर पासून उमेदवारांचे नामनिर्देशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.
त्या अनुषंगाने विविध पक्षाकडून रॅली, सभेचे आयोजन करण्यात येत आहे. या दरम्यान दोन पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर येवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 चे कलम 37 (1), (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) नुसार जिल्ह्यात दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 12 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू केला आहे.
हा हुकूम सरकारी अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणेचे संदर्भात कामकाज करताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात, आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे. अशा व्यक्तींना, तसेच सर्व जाती धर्माचे सण, उत्सव, जयंती, यात्रा, इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही.