घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ

नवी दिल्ली : महागाईमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना घरगुती सिलिंडरच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. इंधन कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली आहे.

नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती १००० पार पोहोचल्या आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे.

राजधानी दिल्लीमध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी १०५३ रुपये, कोलकाता १०७९, मुंबई १०५२, चेन्नई १०६८ रुपये मोजावे लागणार आहेत. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत ८.५० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून घरगुती सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. हजार पार गेलेल्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत आता पुन्हा ५० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे नव्या किंमतीनुसार १४ किलोचा सिलिंडर आता १०५३ रुपयांवर पोहोचला आहे. तर, पाच किलोच्या सिलिंडरमध्ये १८ रुपयांनी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळीच तेल कंपन्यांनी हे नवे दर जाहीर केले आहेत. १९ मे नंतर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला नव्हता.

🤙 9921334545